
अहेरी (विशेष प्रतिनिधी):- अहेरी नगर पंचायतीचे कर व प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे (वय ३४ वर्ष) यांच्यावर आज सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान काही इसमांनी पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव पांढरे हे नेहमीप्रमाणे आज दिनांक १० जून २०२६ रोजी सकाळी ६:४५ वाजताच्या सुमारास इंदाराम रोडने मॉर्निंग वॉक करत असताना, अबनपल्ली फाटा ते चेरपल्ली फाटा दरम्यान प्रशांत भागवत यांच्या शेताजवळ मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या ‘महिंद्रा बोलेरो’ (क्रमांक: MH-33-8989) गाडीतून आलेल्या तीन जणांनी त्यांना अडवले.
गाडीतून उतरलेले आरोपी अजय कंकडालवार, त्याचा अंगरक्षक पिंटू मडावी आणि अजय नैताम यांनी वैभव पांढरे यांना अचानक हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व त्यांना जमिनीवर दाबून धरले. पांढरे यांनी या मारहाणीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, मुख्य आरोपी अजय कंकडवार याने गाडीत असलेला लाकडी दांडा आणून पांढरे यांच्या डोक्यावर, कपाळावर आणि डाव्या हाताच्या बाहीवर जोरदार प्रहार केले.
लाकडी दांड्याचा जबर मार लागल्यामुळे पांढरे यांच्या कपाळातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला, तरीही आरोपींनी त्यांना मारहाण करणे सुरूच ठेवले. पांढरे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.
ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीमुळे वाचले प्राण
हा थरार प्राणघातक हल्ला झाल्यावर त्या मार्गावरून ड्रायव्हिंग स्कूल’ची गाडी येत असल्याचे पाहून आरोपींनी पांढरे यांना सोडले आणि घटनास्थळावरून गाडीसह पळ काढला. यानंतर जखमी पांढरे यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीचा आसरा घेतला आणि थेट अहेरी पोलीस स्टेशन गाठले.
पोलिसांकडून तत्परता, रुग्णालयात उपचार सुरू
पोलीस ठाण्यात रक्ताळलेल्या अवस्थेत पोहोचलेल्या अधिकाऱ्याची परिस्थिती पाहून पोलिसांनी तात्काळ पुढील उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे पाठवले.
कायदेशीर कारवाईची मागणी:-
नगर पंचायतीअंतर्गत बेकायदेशीर अतिक्रमणे व बेधडक बांधकामे पाडल्याच्या रागातून आणि मनात पूर्ववैमनस्य धरूनच आपल्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे वैभव पांढरे यांनी आपल्या बयाणात म्हटले आहे. डोक्याला गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजय कंकडवार, पिंडू मडावी आणि अजय नैताम यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अहेरी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शासन व प्रशासन हादरून गेले असून सर्वत्र घटनेचा निषेध केला जात आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये उद्या पासून बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे शासकीय कर्मचाऱ्यांवर जर होत असेल तर शासकीय कर्मचारी सुरक्षित कसे राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाचे पोलिस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.r



