Google search engine
Home आपला विदर्भ अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर उपासमारीची वेळ; ५ महिन्यांचे कमिशन तात्काळ देण्याची...

अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर उपासमारीची वेळ; ५ महिन्यांचे कमिशन तात्काळ देण्याची मागणी 

अहेरी (विशेष प्रतिनिधी):- तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना मागील पाच महिन्यांपासून त्यांच्या हक्काचे कमिशन मिळाले नसल्याने, त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना, तालुका अहेरी च्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांना अहेरीच्या तहसीलदार यांच्यामार्फत एक जाहीर निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे तीव्र लक्ष वेधण्यात आले असून, प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

• कमिशन तात्काळ देण्याची आणि धान्याची मुदत वाढवण्याची मागणी:
दुकानदारांनी निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या ५ महिन्यांपासून कमिशनची रक्कम रखडल्यामुळे दुकानदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे कमिशन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे.
तसेच, सध्या चालू असलेला महिना (जून २०२६) उजाडला तरी अद्याप दुकानांमध्ये शासकीय धान्य पोहोचलेले नाही. धान्य उशिरा येत असल्यामुळे, जून महिन्याचे धान्य पॉश मशीनवर (PoS Machine) विक्री करण्यासाठी त्याची *मुदत जुलै २०२६ पर्यंत वाढवून (कॅरी फॉरवर्ड) देण्यात यावी*, अशीही विनंती दुकानदारांनी केली आहे.

या निवेदनातून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. सन २०२४ मधील एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत तालुक्यातील जवळपास ४० दुकानदारांनी चलनाद्वारे साखरेसाठी रीतसर पैसे भरले होते. मात्र, दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही दुकानदारांना अद्याप साखरही मिळाली नाही आणि त्यांचे पैसेही परत मिळालेले नाहीत. त्यामुळे चलनाद्वारे भरलेले हे पैसे प्रशासनाने तात्काळ परत करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने आमच्या या रास्त मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रलंबित कमिशन देणे, धान्याची विक्री मुदत जुलै अखेरपर्यंत वाढवणे आणि साखरेचे पैसे परत करणे यावर तातडीने कारवाई करावी, अशी नम्र विनंती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पत्तीवार, सचिव तिरुपती किर्तीवार, उपाध्यक्ष पवन ताटीकोंडावार व तालुक्यातील इतर सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर प्रशांत पत्तीवार , रविंद्र पुल्लुरवार, सचिन नागुलावार आणि बापु मळय्या दुर्गे यांच्यासह अनेक दुकानदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

nagvidarbhavartae