
अहेरी:- भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि देशाच्या एकात्मतेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे स्व डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त भाजपा जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या राष्ट्रहितासाठीच्या कार्याचा, त्यागाचा आणि देशाच्या अखंडतेसाठी दिलेल्या योगदानाचा यावेळी स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी डॉ. मुखर्जी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये एक देशात दोन विधान, दोन प्रधान आणि दोन निशाण या व्यवस्थेविरोधात त्यांनी उभारलेला लढा भारतीय राजकारणातील ऐतिहासिक संघर्ष ठरला. राष्ट्राच्या एकात्मतेसाठी त्यांनी दिलेले बलिदान आजही देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे.यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि राष्ट्रहितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच देशाच्या विकासात आणि राष्ट्रनिर्माणात प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास भाजपा अहेरी मंडळातील पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्या स्व डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे कार्य आणि विचार आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहतील, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला.



