
•मतदार यादी पुनरीक्षणासाठी निवडणूक आयोगाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
अहेरी/पंकज नौनुरवार :- महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. कोकण, मुंबई आणि राज्यातील काही भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने या कार्यक्रमास मुदतवाढ दिली आहे. याबाबत माहिती देताना अहेरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी सांगितले की, आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी पुनरीक्षणाची संपूर्ण प्रक्रिया आता नव्या वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे. तसेच सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनी या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
•सुधारित पुनरीक्षण कार्यक्रम. – गृहभेटी (बीएलओमार्फत) : ३० जून २०२६ ते ८ ऑगस्ट २०२६
– मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण/पुनर्रचना : ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत
– मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी : १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार)
– दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६
– दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढणे : १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६
– मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी : १९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार)
∆ अहेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आवाहन:- ६९ अहेरी विधानसभा मतदारसंघात अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि मुलचेरा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांतील नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी आणि गृहभेटीदरम्यान येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बीएलओ नागरिकांकडून रहिवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा तसेच इतर आवश्यक माहिती व कागदपत्रांची मागणी करतील. मतदार यादीतील नावे अचूक नोंदविण्यासाठी नागरिकांनी ही माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
•मुदतवाढीचा दुर्गम भागांना होणार फायदा:- यापूर्वी गृहभेटींचा टप्पा २९ जुलैपर्यंत प्रस्तावित होता. मात्र आता त्याला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने दुर्गम गावांपर्यंत बीएलओंना पोहोचून पुनरीक्षण फॉर्मचे वितरण, संकलन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध होणार आहे. विशेषतः ज्या मतदारांची माहिती जुन्या नोंदींशी जुळत नाही किंवा मतदार यादीत नाव, पत्ता अथवा इतर तपशीलांमध्ये त्रुटी आहेत, अशा मतदारांनी आवश्यक पुरावे सादर करणे गरजेचे आहे. संबंधित मतदारांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावण्यात येणार असून त्यावेळी रहिवास व जन्मतारखेचे पुरावे सादर करावे लागतील.
• दुबार नावे व बदलांची माहिती द्या: कुटुंबातील एखाद्या महिलेचे विवाहानंतर दुसऱ्या मतदारसंघात नाव समाविष्ट झाले असल्यास किंवा एखादी व्यक्ती कायमस्वरूपी इतरत्र स्थलांतरीत झाली असल्यास, मयत झाली असल्यास त्याची माहितीही बीएलओंना द्यावी. त्यामुळे मतदार यादीतील दुबार नोंदी कमी होऊन यादी अधिक अचूक होण्यास मदत होईल.
• राजकीय पक्षांनाही सहकार्याचे आवाहन: मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनीही बीएलए नेमणुक करून,बीएलओंना फॉर्म संकलन, माहिती पडताळणी आणि डिजिटायझेशन प्रक्रियेत आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी केले. ते म्हणाले, “स्थानिक पातळीवर नागरिक, नगरपंचायत/ग्रामपंचायत, राजकीय पक्ष आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यास शंभर टक्के पात्र मतदारांची अचूक यादी तयार होईल. कोणताही पात्र मतदार ,मतदार यादीतून वगळला जाऊ नये आणि कोणताही अपात्र व्यक्ती मतदार यादीत राहू नये ,हा या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”
प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, गृहभेटीदरम्यान बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देऊन लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.





