
अहेरी (गडचिरोली):-
आगामी मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहेरी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि उत्सव शांततेत साजरा व्हावा, यासाठी आज दिनांक २५ जून २०२६ रोजी अहेरी पोलिसांतर्फे रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १७ जून ते २६ जून २०२६ दरम्यान साजरा होणाऱ्या मोहरम उत्सवादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याची पूर्वतयारी म्हणून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
सायंकाळी १६:३० ते १७:२० वाजेच्या दरम्यान सर्वप्रथम अहेरी पोलीस स्टेशन येथे ‘दंगा काबू पथक’ (रॅपिड ॲक्शन/दंगा नियंत्रण पथक) ची तालीम घेण्यात आली. त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गांवरून रूट मार्च काढण्यात आला.
हा रूट मार्च पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन पुढील मार्गाने काढण्यात आला:
मज्जित चौक ➔ आझाद चौक ➔ दानशूर चौक ➔ राजवाडा रोड ➔ गांधी चौक ➔ गड अहेरी रोड
शहरातील मुख्य भागांना आणि संवेदनशील चौकांना भेटी देत हा रूट मार्च पुन्हा अहेरी पोलीस स्टेशन येथे येऊन समाप्त झाला. या मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आणि सुरक्षेचे आवाहन केले आहे.
•मोठ्या संख्येने पोलीस बळ तैनात
या रूट मार्चमध्ये कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. यामध्ये:
पोलीस अधिकारी: ०४
पोलीस अंमलदार:३८
आरसीपी प्लाटून (प्राणहिता):३० अंमलदार
होमगार्ड: ३० अंमलदार
उत्सवाच्या काळात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करून मोहरम उत्सव शांततेत व सलोख्याने साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



