गडचिरोली, दि. 30 : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून पावसाची व पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 123 मिमी पावसाची नोंद झाली असून काही भागांत तब्बल 200 मिमीपर्यंत पाऊस झाला आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 700 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यांची विविध आश्रमशाळा तसेच इतर सुरक्षित ठिकाणी निवास व आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) पथक तैनात करण्यात आले असून जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासन परस्पर समन्वयाने काम करत असून पूरग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण 17 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने नागरिकांना सतर्क करण्यात येत असून अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भामरागड तालुक्यावगळता जिल्ह्यातील इतर भागांतील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून प्रशासनाकडून सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.




