
दुःखाच्या प्रसंगी राजे अम्ब्रिशराव आत्राम ठरले आधारस्तंभ; अर्का कुटुंबीयांना पाठवली आर्थिक मदत
अहेरी (दिनांक २६ ऑगस्ट २०२६):-
अहेरी तालुक्यातील राजाराम येथील रहिवासी असलेले जीवन सखाराम अर्का (वय २८) यांचे कावीळ या आजारावर उपचार सुरू असताना दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्रवारी दुर्दैवी निधन झाले. कुटुंबातील एकुलत्या एका मुलाच्या अकाली निधनाने अर्का कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या कठीण प्रसंगी माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पुढे येत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
जीवन अर्का यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या या बिकट प्रसंगात सहभागी होत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी त्यांच्या तेरवी कार्यक्रमासाठी तातडीने आर्थिक मदत पाठवली. ही मदत भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष विकास तोडसाम आणि भाजप जिल्हा सचिव अभिजित शेंडे, अरविंद परकीवार,शंकर सिडाम यांच्यामार्फत अर्का कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात आली.
याशिवाय, राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी स्वतः दूरध्वनीवरून शोकसंताप व्यक्त करत अर्का कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली आणि धीर दिला. “दुःखाच्या या कठीण काळात कुटुंबीयांनी खचून जाऊ नये; भविष्यातही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मी सदैव आपल्या पाठीशी उभे राहीन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या दुःखात धावून जाण्याची आणि त्यांना संकटाच्या काळात मोलाचा आधार देण्याची आपली भूमिका राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेबद्दल राजाराम परिसरातून कौतुक होत असून, ग्रामस्थांकडून दिवंगत जीवन अर्का यांना श्रद्धांजली अर्पण करून शोकाकुल कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली जात आहे.



