Google search engine
Home आपला विदर्भ सिरोंचात धानाची ‘कोंडी’: पेंटीपाका खरेदी केंद्रावर १० हजार क्विंटलची मर्यादा संपली; शेतकरी...

सिरोंचात धानाची ‘कोंडी’: पेंटीपाका खरेदी केंद्रावर १० हजार क्विंटलची मर्यादा संपली; शेतकरी संकटात

सिरोंचा:-
पेंटीपाका येथील धान खरेदी केंद्रावर १० हजार क्विंटल धानाची उद्दिष्ट (टारगेट) पूर्ण झाल्यामुळे प्रशासनाने खरेदी थांबवली आहे, मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांचे धान विक्रीविना पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऐन हंगामात धानाची विक्री न झाल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची आक्रमक मागणी केली आहे.

सध्या पेंटीपाका धान खरेदी केंद्रावर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. धान विक्रीसाठी दररोज १५० ते २०० शेतकऱ्यांची गर्दी उसळत असून, केंद्राबाहेर ४० ते ५० ट्रॅक्टर्सच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत प्रशासनाने खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:-
शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने खालील मागण्या केल्या आहेत:
उद्दिष्टात वाढ:- १० हजार क्विंटलची मर्यादा तत्काळ वाढवण्यात यावी.
मुदतवाढ:- धान खरेदी प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी किमान १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी.
सर्वसमावेशक खरेदी:- नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी होईपर्यंत प्रक्रिया थांबवू नये.
“आम्ही रात्रंदिवस मेहनत करून धान पिकवले आहे. आता ते विकण्यासाठी केंद्रावर नेले असता, उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून आम्हाला परत पाठवले जात आहे. शेतीचा खर्च कसा निघणार? शासनाने तातडीने दखल घेऊन आम्हाला दिलासा द्यावा,” अशी व्यथा येथील संतप्त शेतकऱ्यांनी मांडली आहे.

आता शासन यावर काय निर्णय घेते आणि शेतकऱ्यांची ही कोंडी कधी फुटते, याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

nagvidarbhavartae