Google search engine
Home आपला विदर्भ आदिवासी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आदिशक्ती पुरस्कार’; गडचिरोली जिल्ह्याचा गौरव

आदिवासी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आदिशक्ती पुरस्कार’; गडचिरोली जिल्ह्याचा गौरव

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने सन 2025-26 साठी आदिवासी अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आदिशक्ती पुरस्कार’ जाहीर केले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय 31 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला.

राज्यातील आदिवासी भागांमध्ये महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यासाठी हा आदिशक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे ग्रामपंचायतींना अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे, जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत गौरीपूर हिने प्रथम क्रमांक, अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत खमनचेरू हिने द्वितीय क्रमांक, तर देसाईगंज (वडसा) तालुक्यातील ग्रामपंचायत तुळशी हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

याबाबत माहिती देताना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईत म्हणाले, “आदिशक्ती पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीचा अभियानात सहभाग अनिवार्य होता. अभियान सुरू करण्यापूर्वी विशेष ग्रामसभा घेऊन सर्व ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना, अभियानाची माहिती देण्यात आली. महिला सक्षमीकरण, महिला बचत गट, उद्योजकता, कौशल्य विकास, महिला हक्क जनजागृती तसेच शासनाच्या महिलाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यात आला. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, पोषण, शिक्षण, सामाजिक समता आणि पारदर्शक प्रशासन या क्षेत्रांतील कामगिरीबरोबरच ग्रामसभा, विविध समित्यांचे नियमित कामकाज आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला. सर्व कामांचे पुरावे, छायाचित्रे, अहवाल व ऑनलाइन नोंदी अद्ययावत ठेवण्यात आल्या. या सर्व बाबींचे गुणांकन करून तालुका व जिल्हास्तरावर ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली.”

या उल्लेखनीय यशाबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमार्फत संबंधित ग्रामपंचायतींचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आदिशक्ती पुरस्कारामुळे जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनाही महिला व बाल विकासाशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

nagvidarbhavartae