Google search engine
Home आपला विदर्भ श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. रवींद्र हजारे यांचा सेवापूर्ती...

श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. रवींद्र हजारे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

अहेरी:-
अहेरी येथील श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख आणि आयक्यूएसी (IQAC) समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र डी. हजारे यांच्या प्रदीर्घ सेवापूर्तीनिमित्त त्यांचा भव्य निरोप व सत्कार समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सोमकुवर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात पार पडला.
डॉ. रवींद्र हजारे यांनी २० नोव्हेंबर २०१४ ते ३० जून २०२६ या प्रदीर्घ कार्यकाळात महाविद्यालयाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या शैक्षणिक प्रवासाचा गौरव करण्यासाठी आयोजित या सोहळ्यात मान्यवरांनी त्यांच्या कारकिर्दीचे कौतुक केले. याप्रसंगी मंचावर आर. डी. सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. चिन्नना चालूरकर, भगवंतराव शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू सोनोणे आणि आर. डी. कॉलेज नागेपल्लीच्या प्राचार्या डॉ. रंजना लाड हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.
                        कार्यक्रमादरम्यान डॉ. रवींद्र हजारे आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ. संध्याताई हजारे यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन भावुक वातावरणात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या सहकाऱ्यांनी सरांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देणारा एक विशेष व्हिडिओ प्रोजेक्टरवर सादर केला, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ प्राध्यापक प्रा. चंद्रशेखर गौरकार यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. गीतांजली बंडावार यांनी केले. सत्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी डॉ. सोनाली वाघ, प्रा. अनुराग तुंडुलवार, प्रा. निलेश गर्गम आणि व्हिडिओ निर्मितीचे कौशल्य दाखवणारे प्रा. शामल बिश्वास यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार प्रा. गौरव तेलंग यांनी मानले.
या विशेष प्रसंगी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अरविंद सावकार पोरेड्डीवार, सचिव प्रशांतभाऊ पोटदुखे व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्कारमूर्ती डॉ. हजारे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

nagvidarbhavartae