
अहेरी | दि. २३ ऑगस्ट २०२६:-
अहेरी येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात माता दुर्गादेवीच्या मूर्तीची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक विधी, पूजा-अर्चा, हवन, चंडीपाठ आदी कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी श्रीमंत राजे अंब्रिशराव आत्राम यांनी श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरासाठी दुर्गामातेची मूर्ती आपल्या वतीने भेट दिली. त्यांच्या या भक्तिभावपूर्ण योगदानामुळे मंदिराच्या धार्मिक वैभवात आणखी भर पडली आहे.
आज सकाळी विधिवत पूजा, हवन, चंडीपाठ तसेच विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दुर्गामातेचे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतला.
या सोहळ्यामुळे अहेरी परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आता दुर्गामातेच्या नव्या देवस्थानामुळे भाविकांसाठी आणखी एक श्रद्धास्थान निर्माण झाले आहे.
“जय दुर्गामाता, जय श्री दक्षिणमुखी हनुमान!” या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.



