
•”आरोग्य रुग्णालयाचे राजकारण: ‘बाबां’बद्दल मौन आणि मुख्यमंत्र्यांवर नेम; गुडेल्लीवारांचा गंभीर आरोप”
अहेरी:- अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) द्वारे करण्यात आलेले ‘ताला ठोको’ आंदोलन आणि उपोषण सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र, या आंदोलनावरून अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांवर जोरदार टीका करत हे सर्व ‘सोईचे राजकारण’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
•’बाबां’बद्दल मौन, मुख्यमंत्र्यांवर नेम?
नगरसेवक गुडेल्लीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार, अहेरीचे स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम हे सध्या सत्ताधारी पक्षात आहेत. सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असताना, त्यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडून जनतेला न्याय मिळवून देणे अपेक्षित होते. मात्र, आंदोलकांनी स्थानिक आमदारांबद्दल एक चकार शब्दही न काढता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. सिरोंचा नगरपंचायत, बाजार समितीतील अविश्वास ठराव आणि अहेरी पोटनिवडणुकीत उमेदवार न देणे, या घटना राष्ट्रवादीचे दोन्ही गट पडद्यामागे एकत्र असल्याचेच सिद्ध करतात, असा दावा गुडेल्लीवार यांनी केला आहे.
गुडेल्लीवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, २०१० मध्ये तत्कालीन पालकमंत्री आर.आर. पाटील यांनी अहेरीचे रुग्णालय गडचिरोलीला हलवले होते. मात्र, २०१६ मध्ये तत्कालीन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा उपलब्ध करून देऊन हे रुग्णालय पुन्हा अहेरीत मंजूर केले. ज्यांनी रुग्णालय परत आणले, त्यांच्यावरच आरोप करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
•आरोग्य विभागाची तत्परता आणि आंदोलकांचे ‘स्टंट’
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारभारावर टीका करताना, डॉक्टरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून कामाचा ताण वाढवणे चुकीचे असल्याचे गुडेल्लीवार यांनी मान्य केले. मात्र, मुख्य आरोपीला सोडून मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवणे हे ‘चोराला सोडून संन्याशाला फाशी’ देण्यासारखे आहे. आरोग्य विभागाने तातडीने ४ डॉक्टरांची नियुक्ती केली असून, पूर्णवेळ भरतीची प्रक्रिया सुरू असताना केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे आंदोलन म्हणजे एक ‘स्टंटबाजी’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अहेरीची जनता या सोईच्या राजकारणाला कधीही बळी पडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.



