Google search engine
Home आपला विदर्भ अहेरीकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आवाज बुलंद; नियमित व स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी

अहेरीकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आवाज बुलंद; नियमित व स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी

अहेरी :-
अहेरी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना दर दोन दिवसाआड व अनियमित वेळेत पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय अनेक भागांमध्ये नळाद्वारे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अहेरी शहरात दररोज नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, पाणीपुरवठ्याची निश्चित वेळ जाहीर करून तिचे काटेकोर पालन करावे, नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच गढूळ पाणी येण्यामागील कारणांची तातडीने चौकशी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन दिगंबर येरोजवार, आयुष सुनील मामीडवार, अतुल उइके, सेवानिवृत्त शिक्षक दामोधरजी राऊत आणि कुसराम उपस्थित होते.

nagvidarbhavartae