
अहेरी, दि. 12 जुलै : खरीप हंगाम सुरू होऊनही शेतकऱ्यांना डीएपी (DAP) व युरिया खताचा पुरेसा पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), अहेरी विधानसभा यांच्या वतीने उद्या, सोमवार (13 जुलै) रोजी दुपारी 1 वाजता तालुका कृषी कार्यालय, अहेरी येथे ‘चष्मा भेट आंदोलन’ करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व सिनेट सदस्य तथा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम करणार आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, “चष्मा लावा, शेतकऱ्यांचे दुःख बघा” हा संदेश देण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात चष्मा भेट देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
आयोजकांच्या मते, खरीप हंगामाला एक महिना उलटूनही डीएपी व युरिया खत उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या असून उगवलेल्या पिकांनाही फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून शासनाने तातडीने खतांचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे.
या आंदोलनात अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), अहेरी विधानसभा यांच्या वतीने करण्यात आले आहे.



