Google search engine
Home आपला विदर्भ अहेरीतील मोकाट जनावरांच्या समस्येला दिलासा! जुने तहसील कार्यालयाची जागा तात्पुरत्या कोंडवाड्यासाठी उपलब्ध...

अहेरीतील मोकाट जनावरांच्या समस्येला दिलासा! जुने तहसील कार्यालयाची जागा तात्पुरत्या कोंडवाड्यासाठी उपलब्ध होणार; नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या पाठपुराव्याला यश

अहेरी : शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या मोकाट जनावरांच्या गंभीर समस्येवर अखेर तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जुने तहसील कार्यालयाची प्रशस्त जागा (कोर्टाच्या बाजूला) तात्पुरत्या कोंडवाड्यासाठी उपलब्ध करून देण्यास प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी शेतांना तारकुंपण घातले आहे. परिणामी मोकाट जनावरे शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फिरत असून वाहनधारक, पादचारी तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत नुकत्याच पार पडलेल्या अहेरी नगरपंचायतीच्या विशेष सभेत नगरसेवक गुडेल्लीवार यांनी मोकाट जनावरांसाठी तातडीने मोठ्या कोंडवाड्याची व्यवस्था करण्याची जोरदार मागणी केली. नगरपंचायतीकडे सध्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये ग्रामपंचायत काळातील छोटेखानी कोंडवाडा असल्याने तो अपुरा पडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यानंतर त्यांनी अहेरीचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) प्रशांत पिसाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यामध्ये जुने तहसील कार्यालयाची प्रशस्त जागा तात्पुरत्या कोंडवाड्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी सदर जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील पत्र तातडीने जारी केले आहे. त्यानुसार अहेरी नगरपंचायतीकडून विस्तीर्ण तात्पुरता कोंडवाडा उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे अहेरी शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येवर लवकरच प्रभावी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या पाठपुराव्याचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

nagvidarbhavartae