
अहेरी/पंकज नौनुरवार:-
भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात देशसेवेत प्राणांची आहुती देणारे सी-६० दलातील शूर जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्या टर्म पॉलिसीअंतर्गत १ कोटी १० लाख रुपयांचा विमा धनादेश प्रदान करण्यात आला. या आर्थिक मदतीमुळे शहीद जवानांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षिततेचा आधार निर्माण झाला आहे.
दीपक मडावी यांनी सेवेत असतानाच भारतीय स्टेट बँकेत खाते उघडून एसबीआय लाईफची टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. त्यांच्या निधनानंतर विमा दावा मंजूर झाल्यानंतर अहेरी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या पत्नी शालिनी दीपक मडावी यांना अधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शहीद जवानांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या त्यागाला अभिवादन केले.
धनादेश वितरण कार्यक्रमाला अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक हृदयनाथ, सी-६० चे प्रभारी अधिकारी राहुल देवडडे, एसबीआय लाईफचे बिझनेस मॅनेजर शिवाजी होडबे तसेच विमा सल्लागार तिरुपती बोम्मनवार यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित अधिकाऱ्यांनी शहीद जवान दीपक मडावी यांच्या कर्तृत्वाचे स्मरण करत, त्यांच्या बलिदानामुळे देशाची सुरक्षा अधिक बळकट झाली असून, अशा वीर जवानांचा त्याग कधीही विसरता येणार नाही, असे सांगितले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, शहीद जवानांच्या कुटुंबाला केवळ शासकीय मदतच नव्हे तर विमा संरक्षणाचाही मोठा लाभ मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा प्रकारचे विमा संरक्षण संकटकाळात कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरते आणि भविष्यातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठी मदत करते.
शहीद दीपक मडावी यांच्या पत्नी शालिनी मडावी यांनी उपस्थित अधिकारी व एसबीआय लाईफच्या प्रतिनिधींचे आभार मानत, या आर्थिक मदतीमुळे कुटुंबाला मोठा आधार मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबीयांनीही या मदतीबद्दल समाधान व्यक्त करत शहीद जवानांच्या स्मृती कायम जपल्या जातील, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शहीद दीपक मडावी यांच्या शौर्याला अभिवादन केले. त्यांच्या बलिदानामुळे देशातील नागरिक सुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत, शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पाठीशी प्रशासन, समाज आणि विविध संस्था कायम उभ्या राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शहीद जवानांच्या कुटुंबाला मिळालेला हा विमा धनादेश केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या त्यागाला समाजाने दिलेला सन्मान असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.



