पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप; मनसे-शिवसेना (उ.बा.ठा)ची महावितरणकडे तक्रार
आलापल्ली, प्रतिनिधी : महावितरणकडून ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी उपविभागीय अभियंता, महावितरण, आलापल्ली यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. ग्राहकांच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, MERC Electricity Supply Code and Standards of Performance of Distribution Licensees including Power Quality Regulations, 2021 मधील नियम 15.2.1 नुसार कोणतेही वीज मीटर बदलण्यापूर्वी संबंधित ग्राहकाला किमान दोन दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. मात्र आलापल्ली उपविभागात अनेक ठिकाणी कोणतीही लेखी सूचना, एसएमएस, व्हॉट्सअॅप, ई-मेल किंवा अन्य माध्यमातून माहिती न देता थेट स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मनसे आणि शिवसेनेने महावितरणकडे मीटर बदलण्यापूर्वी पूर्वसूचना दिल्याचा लेखी पुरावा सादर करण्याची मागणी केली आहे. तसेच, नियमांचे पालन झाले नसल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून नियमभंगाची नोंद घ्यावी, तक्रारीवर नियमानुसार लेखी निर्णय द्यावा आणि भविष्यात ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात मनसेने स्पष्ट इशारा दिला असून, तक्रारीवर १५ दिवसांच्या आत नियमानुसार कार्यवाही न झाल्यास महावितरणविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. ग्राहकांचे कायदेशीर हक्क अबाधित ठेवणे ही महावितरणची जबाबदारी असून नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे.
दरम्यान, निवेदन सादर करताना मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षा सोनल वाकुलकर, शिवसेना (उ.बा.ठा)चे जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम यांच्यासह सुदामा हलदार, प्रणित श्रीरामवार, राहुल पित्तलवार, संतोष अग्रवाल, तुळजा तलांडे, रुपेश बंडेला, मिंटू सय्यद, अक्षय तुंबडे, नंदकिशोर मानकर, परशुराम गंजीवार तसेच मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






