Google search engine
Home आपला विदर्भ सर्वांसाठी घरे’ योजनेत दलालीचा आरोप; चेरपल्लीतील दोघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार, निष्पक्ष चौकशीची मागणी

सर्वांसाठी घरे’ योजनेत दलालीचा आरोप; चेरपल्लीतील दोघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार, निष्पक्ष चौकशीची मागणी


•दोषींवर कठोर कारवाई करण्याची नगर सेवक अमोल गुडेल्लीवार यांची मागणी

अहेरी | प्रतिनिधी:-
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘सर्वांसाठी घरे’ योजनेच्या नावाखाली लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक आरोप अहेरी तालुक्यातील चेरपल्ली येथे समोर आला आहे. याप्रकरणी गावातील विनोद रामटेके व अमोल रामटेके यांच्याविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

महसूल विभागाच्या ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करून पात्र नागरिकांना मालकी पट्टे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार अहेरी नगरपंचायतीकडे प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागामार्फत जागेचे सर्वेक्षण व मोजणीचे काम सुरू आहे.

अशातच चेरपल्ली येथे सर्वेक्षणासाठी अधिकारी पोहोचल्यावेळी काही व्यक्तींनी “मालकी पट्टे मिळवून देतो” असे आमिष दाखवत लाभार्थ्यांकडून ३ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेकांनी रोख स्वरूपात पैसे दिल्याचाही दावा तक्रारदारांनी केला आहे.

फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर चेरपल्लीतील सुमारे २० लाभार्थ्यांनी अहेरी नगराध्यक्षा रोजा करपेत यांच्या उपस्थितीत अहेरी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली.

या प्रकरणाची माहिती मिळताच नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी तातडीने चेरपल्लीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम मांडत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

यावेळी गुडेल्लीवार यांनी आणखी गंभीर आरोप करत, तक्रार दाखल झाल्यानंतर ती मागे घेण्यासाठी काही तक्रारदारांवर दबाव आणला जात असल्याचे सांगितले. तसेच एका लोकप्रतिनिधीने तक्रारदारांना घरी बोलावून कोणताही मजकूर न वाचू देता जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपांचीही चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, ‘सर्वांसाठी घरे’सारख्या लोककल्याणकारी योजनेच्या नावाखाली दलाली आणि फसवणुकीचे आरोप समोर आल्याने अहेरी तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलीस चौकशीच्या निष्कर्षाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

nagvidarbhavartae