Google search engine
Home आपला विदर्भ अहेरी नगरपंचायत पोटनिवडणूक: प्रभाग ९ मध्ये ‘तुतारी’चा ऐतिहासिक विजय; भाजपच्या उमेदवाराचा पराभव

अहेरी नगरपंचायत पोटनिवडणूक: प्रभाग ९ मध्ये ‘तुतारी’चा ऐतिहासिक विजय; भाजपच्या उमेदवाराचा पराभव

गडचिरोली/अहेरी:-
अहेरी नगरपंचायत अंतर्गत अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या प्रभाग क्रमांक ९ च्या पोटनिवडणुकीचा निकाल आज, २१ जून २०२६ रोजी जाहीर झाला. या चुरशीच्या आणि द्विरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवाराने भाजपला धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अहेरी नगरपंचायतीमध्ये ‘तुतारी’ पक्षाने पहिल्यांदाच आपले खाते उघडले असून या विजयाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

•थेट लढतीत संजना मडावी विजयी:
या प्रभागात प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यात थेट आणि कांटे की टक्कर पाहायला मिळाली. आज झालेल्या मतमोजणीत तुतारी पक्षाच्या उमेदवार संजना हनुमंतु मडावी यांनी बाजी मारली. त्यांना एकूण १९७ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार माया शंकर येलुरकर यांना १८७ मते मिळाली. संजना मडावी यांनी १० मतांच्या निसटत्या फरकाने भाजप उमेदवाराचा पराभव केला. तर उर्वरित ९ मते ‘नोटा’ (NOTA) ला पडली.

•महिला मतदारांचा टक्का ठरला निर्णायक:
या पोटनिवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. एकूण ६१.५० टक्के मतदानाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे, यामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा टक्का अधिक राहिला, जो निकालासाठी अत्यंत निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.

मतदानाचा तपशील:
पुरुष मतदार १९३
महिला मतदार २००
एकूण मतदान ३९३,
एकूण टक्केवारी ६१.५०% होती.
दोन्ही पक्षांनी या प्रभागात आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष या प्रभागाचा नवा कारभारी कोण होणार याकडे लागले होते. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत गांगुर्डे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित सोनवाणे यांनी संपूर्ण निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रियेची धुरा यशस्वीपणे सांभाळली. कोणताही अनुचित प्रकार न घडता ही प्रक्रिया शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे. या विजयानंतर अहेरीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

nagvidarbhavartae