
गडचिरोली/अहेरी:-
अहेरी नगरपंचायत अंतर्गत अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या प्रभाग क्रमांक ९ च्या पोटनिवडणुकीसाठी आज, २० जून २०२६ रोजी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, एकूण ६१.५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
आज झालेल्या मतदानामध्ये महिला मतदारांचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक राहिल्याचे पाहायला मिळाले. एकूण ३९३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
पुरुष मतदार – १९३
महिला मतदार – २००
एकूण मतदान – ३९३
एकूण टक्केवारी – ६१.५०%
या पोटनिवडणुकीत प्रामुख्याने द्विरंगी आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवार
माया शंकर येलुरकर,भारतीय जनता पक्ष (भाजपा),
संजना हनुमंतु मडावी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)
दोन्ही पक्षांनी या प्रभागात आपली ताकद पणाला लावली असल्याने, या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण अहेरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती. निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत गांगुर्डे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित सोनवाणे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची धुरा यशस्वीपणे सांभाळली. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
आता सर्वांचे लक्ष आगामी मतमोजणीकडे आणि या प्रभागाचा नवा कारभारी कोण होणार, याकडे लागले आहे.



