Google search engine
Home आपला विदर्भ वैभव पांढरे प्राणघातक हल्ला प्रकरण: मुख्य ३ आरोपींना ‘MCR’; माजी जि.प. अध्यक्ष...

वैभव पांढरे प्राणघातक हल्ला प्रकरण: मुख्य ३ आरोपींना ‘MCR’; माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांच्या जामीन अर्जावर बुधवारी फैसला!

अहेरी (गडचिरोली):
अहेरी नगरपंचायतीचे कर व प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाला आता एक अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे. पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या तीन मुख्य आरोपींना आज (सोमवार) अहेरी पोलिसांनी चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची थेट न्यायालयीन कोठडीत (MCR) रवानगी केली आहे.
दुसरीकडे, या हाय-प्रोफाइल प्रकरणातील मुख्य संशयित आणि काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या जामीन अर्जावर आता येत्या बुधवारी न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष आता या प्रकरणाकडे आणि न्यायालयीन घडामोडींकडे वेधले गेले आहे.
कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर हे तिन्ही मुख्य आरोपी सातत्याने फरार होते. मात्र, अहेरी पोलिसांनी तपासाचा आणि अटकेचा वाढवलेला प्रचंड दबाव पाहता, अखेर या तिघांनाही पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे लागले होते.
न्यायालयीन कोठडी मिळालेले आरोपी:
१. अजय दादाराव नैताम
२. श्रीनिवास उर्फ पिंटू लक्ष्मण मडावी
३. इमरान मुस्तफा पठाण

•पोलीस कोठडीऐवजी ‘MCR’: या प्राणघाती हल्ल्यामागचा मुख्य हेतू, रचलेला कट आणि यात आणखी कोणत्या पडद्यामागच्या सूत्राधारांचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांकडून आरोपींची पोलीस कोठडी (PCR) मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, न्यायालयाने युक्तिवादानंतर तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली. यापूर्वी मुख्य संशयित अजय कंकडालवार यांनाही १३ जून रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?
अहेरी नगरपंचायतीचे कर व प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असता, त्यांच्यावर अज्ञात इसमांनी जीवघेणा भ्याड हल्ला केला होता. अहेरी नगरपंचायतींतर्गत करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा राग मनात धरून, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप आहे.
या गंभीर गुन्ह्याची नोंद होताच अहेरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सर्वात आधी मुख्य संशयित माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना अटक केली होती. कंकडालवार यांच्या अटकेनंतर पोलिसांची धास्ती वाढल्याने उर्वरित तीन आरोपींनाही शरण यावे लागले.

बुधवारी काय होणार? राजकीय वर्तुळाचे डोळे न्यायालयाकडे!
या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अजय कंकडालवार सध्या जेलमध्ये (न्यायालयीन कोठडीत) आहेत. त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे.

सुनावणीचा दिवस: येणारा बुधवार
•उत्कंठा वाढली: न्यायालय कंकडालवार यांना जामीन मंजूर करून दिलासा देणार की त्यांचा जेलमधील मुक्काम वाढणार? याकडे आता केवळ अहेरीचेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे डोळे लागले आहेत.
पुढील तपासात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

nagvidarbhavartae