Google search engine
Home आपला विदर्भ अहेरी शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद; नगरसेविका लक्ष्मी मद्दीवार यांची मुख्याधिकाऱ्यांकडे कडक कारवाईची...

अहेरी शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद; नगरसेविका लक्ष्मी मद्दीवार यांची मुख्याधिकाऱ्यांकडे कडक कारवाईची मागणी

अहेरी:-
अहेरी शहरात सध्या मोकाट गुरे, कुत्रे आणि माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या तथा नगरसेविका सौ. लक्ष्मी संतोष मद्दीवार यांनी नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
•वाहतुकीचा खोळंबा आणि अपघातांचे सत्र:
शहरातील मुख्य रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट बैलांच्या झुंडींमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा या जनावरांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, नागरिकांनाही दुखापत होत असल्याच्या घटना घडत आहेत. या समस्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
•नगरसेविकांची मागणी:
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सौ. मद्दीवार यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत त्यात त्यांनी म्हटले की, जोपर्यंत कोंडवाड्याचे रितसर हस्तांतरण आणि दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत मागील वर्षाप्रमाणे मोकाट जनावरांना जुन्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जमा करावे.
केवळ गुरेच नव्हे, तर मोकाट कुत्रे आणि माकडांच्या टोळ्यांमुळेही नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी आपापसात समन्वय साधून त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
शहरातील वाढता उपद्रव पाहता, प्रशासन यावर कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता अहेरीकरांचे लक्ष लागले आहे.

nagvidarbhavartae