Google search engine
Home आपला विदर्भ अहेरीच्या आरोग्य सेवेचा बोजवारा; जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चौकशीसाठी भाजपचे आरोग्यमंत्र्यांना साकडे

अहेरीच्या आरोग्य सेवेचा बोजवारा; जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चौकशीसाठी भाजपचे आरोग्यमंत्र्यांना साकडे

अहेरी:- 
अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे पूर्णपणे कोलमडली असून, रुग्णांचे हाल होत आहेत. या परिस्थितीला जिल्हा शल्य चिकित्सक लहाडे यांच्या हेकेखोर कार्यपद्धती जबाबदार असल्याचा आरोप करत, भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबईत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन त्यांना तातडीने पदावरून हटवण्याची आणि त्यांच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
• वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे डॉक्टरांचे राजीनामे
अहेरीच्या रुग्णालयातून अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक लहाडे यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली असून, अशा वादग्रस्त अधिकाऱ्याची इतक्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती कशी झाली, असा संतप्त सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
• आरोग्यमंत्र्यांकडून चौकशीचे आश्वासन
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास उईके, मुकेश नामेवार आणि संजय पोहणेकर यांच्या शिष्टमंडळाने विधानभवनात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. या भेटीत अहेरी रुग्णालयातील दुरवस्था आणि रिक्त पदांमुळे उद्भवणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती दिली.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन, आरोग्यमंत्री आबिटकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक लहाडे यांच्या चौकशीचे तत्काळ निर्देश दिले आहेत. तसेच, अहेरी रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती लवकरात लवकर करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनामुळे अहेरीच्या रुग्णसेवेतील अडथळे दूर होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

nagvidarbhavartae