
अहेरी/गडचिरोली (१३ जून):-
अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना आज चामोर्शी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयातील दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने कंकडालवार यांना MCR (मॅजिस्ट्रियल कस्टडी रिमांड) म्हणजेच न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार त्यांची रवानगी आता चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) केली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
• तपासादरम्यान संशयास्पद लाकूड जप्त; पोलीस कोठडीची मुदत संपली:
यापूर्वी पोलिसांनी अजय कंकडालवार यांना अटक करून त्यांची पोलीस कोठडी मिळवली होती. या पोलीस कोठडीच्या कालावधीत तपास यंत्रणेने अत्यंत वेगाने चक्रे फिरवली.
फॉरेन्सिक चौकशी: पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत फॉरेन्सिक तपासणी केली आणि महत्त्वाचे पुरावे गोळा केले.
• हल्ल्याचे हत्यार हस्तगत: तपासादरम्यान अधिकार्यांवर झालेल्या हल्ल्यात वापरण्यात आल्याचा संशय असलेले लाकूडही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी जेलमध्ये पाठवण्याचे आदेश दिले.
∆ इतर आरोपींचा शोध सुरू; संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष तपासाकडे__
अहेरीतील या हायप्रोफाईल आणि अत्यंत गाजलेल्या हल्ला प्रकरणाने संपूर्ण गडचिरोली जिल्हा ढवळून निघाला आहे. अजय कंकडालवार यांची जेलमध्ये रवानगी झाली असली, तरी या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. तपास यंत्रणा वेगवेगळ्या अंगाने या गुन्ह्याचा तपास करत आहे.
“कर अधिकारी हल्ला प्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक तपशील समोर येत असल्याने, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे डोळे लागले आहेत.”
क्षणोक्षणाच्या ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत राहा, आमचे नागविदर्भ पोर्टल!



