Google search engine
Home Uncategorized अहेरी नगरात वीज संकट पेटले! अखंडित वीज पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा...

अहेरी नगरात वीज संकट पेटले! अखंडित वीज पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा अहेरी जिल्हा कृती समितीचा इशारा •राजकीय नेत्यांच्या बालेकिल्ल्यातच अंधार; कृती समिती आक्रमक

राजकीय नेत्यांच्या बालेकिल्ल्यातच अंधार; कृती समिती आक्रमक

अहेरी:-
अहेरी विधानसभा क्षेत्राचे केंद्रस्थान आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या अहेरी नगरात गेल्या काही दिवसांपासून विजेची भीषण समस्या निर्माण झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांची निवासस्थाने याच शहरात असताना, सर्वसामान्य नागरिकांना मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही अत्यंत दुर्दैवाची बाब असून, प्रशासनाने ही समस्या त्वरित न सोडवल्यास ‘तीव्र आंदोलन’ छेडण्यात येईल, असा थेट आणि इशारा अहेरी जिल्हा कृती समितीने दिला आहे.
या संदर्भात अहेरी जिल्हा कृती समितीच्या वतीने संबंधित वीज वितरण कंपनीच्या प्रशासनाला एक निवेदन सादर करण्यात आले आहे.

•अखंडित वीज पुरवठा करा, अन्यथा गाशा गुंडाळा!
अहेरी हे केवळ एक नगर नसून संपूर्ण विधानसभा क्षेत्राची नाडी आहे. असे असूनही येथे अघोषित वीज कपात, तांत्रिक बिघाड आणि कमी दाबाने (Low Voltage) होणारा वीज पुरवठा यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यास, व्यापाऱ्यांचे नुकसान आणि कडक उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत असल्याकडे कृती समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

“अहेरीसारख्या महत्त्वाच्या शहरात विजेची अशी दुरवस्था असणे हे स्थानिक प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. नागरिकांना तातडीने अखंडित वीज सेवा मिळालीच पाहिजे, अन्यथा जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही.”
– अहेरी जिल्हा कृती समिती पदाधिकारी.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती:
या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आणि निवेदन सादर करण्यासाठी अहेरी जिल्हा कृती समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

∆प्रमुख मागण्या:
• अहेरी नगरातील वीज कपात त्वरित थांबवण्यात यावी.
•वीज वाहिन्यांवरील तांत्रिक दोष तात्काळ दूर करावेत.
•भविष्यात वीज खंडित होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
आता कृती समितीच्या या इशाऱ्यानंतर महावितरण प्रशासन खडबडून जागे होणार की नागरिकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार, याकडे संपूर्ण अहेरी विधानसभेचे लक्ष लागले आहे.

nagvidarbhavartae