Google search engine
Home आपला विदर्भ पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा करा;पुसुकपल्ली गावातील नागरिकांची मागणी.

पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा करा;पुसुकपल्ली गावातील नागरिकांची मागणी.

पावसाळा तोंडावर, नाल्या मात्र तुंबलेल्या.

अहेरी:-

पंचायत समिती अहेरी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत नागेपल्लीच्या वॉर्ड क्रमांक ०५ मधील पुसुकपल्ली गावातील नाल्या सध्या तुडुंब भरलेल्या असून त्यामध्ये गाळ, कचरा व झुडपे साचल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने नाल्यांची स्वच्छता व गाळ उपसा करण्यात यावा, अशी मागणी गावातील नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.गावातील अनेक ठिकाणच्या नाल्या गेल्या काही वर्षांपासून साफ करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी नाल्यांमधील साचलेला कचरा आणि गाळ यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळला जात आहे.

आगामी पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास नाल्यांचे पाणी रस्त्यावर व घरांच्या परिसरात साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.नाल्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरत असून डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू तसेच इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. गावातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यात पाणी साचल्यास दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याबरोबरच आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देऊन नाल्यांची स्वच्छता मोहीम राबवावी, गाळ उपसून पाण्याचा निचरा सुरळीत करावा आणि गावाला संभाव्य संकटापासून वाचवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना केल्यास गावात स्वच्छता राखण्यास मदत होईल तसेच नागरिकांना होणारा त्रास टाळता येईल. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पुसुकपल्ली येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

nagvidarbhavartae