Google search engine
Home आपला विदर्भ तीन दशकांची निस्वार्थ रुग्णसेवा; आता ‘महाराष्ट्र भूषण’चा मान द्यावा! – अब्दुल जमीर...

तीन दशकांची निस्वार्थ रुग्णसेवा; आता ‘महाराष्ट्र भूषण’चा मान द्यावा! – अब्दुल जमीर अब्दुल हकीम यांची राज्य शासनाकडे जोरदार मागणी

 


★ आदिवासी समाजातील पहिल्या डॉक्टर डॉ. कन्ना मडावी यांचा अहेरीत भव्य नागरी सत्कार; मानपत्र, शाल-श्रीफळ आणि ₹२ लाखांचा धनादेश देऊन गौरव

गडचिरोली/अहेरी :- 
दुर्गम आदिवासी भागात तब्बल तीन दशकांहून अधिक काळ अखंड, निस्वार्थ आणि समर्पित रुग्णसेवा देणारे आदिवासी समाजातील पहिले डॉक्टर डॉ. कन्ना मडावी यांना राज्य शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करावे, अशी ठाम आणि भावनिक मागणी वनवैभव शिक्षण मंडळाचे सचिव अब्दुल जमीर अब्दुल हकीम यांनी केली. अहेरी येथे वनवैभव शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
भावनिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात डॉ. मडावी यांना मानपत्र, शाल-श्रीफळ आणि दोन लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय तसेच आदिवासी क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याला मानवंदना दिली.
अब्दुल जमीर अब्दुल हकीम म्हणाले, “डॉ. कन्ना मडावी हे माडिया समाजातील पहिले डॉक्टर असून त्यांनी हजारो रुग्णांना जीवनदान दिले, शेकडो महिलांची सुरक्षित प्रसूती केली आणि आदिवासी समाजात आरोग्याविषयी विश्वास निर्माण केला. कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी दिवस-रात्र सेवा केली. अनेक राजकीय पक्षांकडून प्रस्ताव येऊनही त्यांनी रुग्णसेवेलाच जीवनाचे ध्येय मानले. अशा व्यक्तिमत्त्वाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव होणे ही काळाची गरज आहे.”
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले अनिकेत आमटे यांनी डॉ. मडावी यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत सांगितले की, “एटापल्ली तालुक्यातील दुर्गम कांदोळी गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. ही त्यांची निवृत्ती नसून समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.”
प्रा. अब्दुल जहीर हकीम यांनी सांगितले की, गेल्या ३० वर्षांत डॉ. मडावी यांनी ११ हजारांहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या असून हजारो रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. तर शाहीन हकीम यांनी त्यांना “मानवतेचा खरा चेहरा” असे संबोधत त्यांच्या त्यागाची प्रशंसा केली.
डॉ. समता मडावी यांनी सांगितले की, शहरात स्थायिक होण्याच्या अनेक संधी असूनही डॉ. मडावी यांनी आदिवासी समाजाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. डॉ. लुबना हकीम यांनीही “मी डॉक्टर होण्यामागील प्रेरणा म्हणजे डॉ. कन्ना मडावी” असे सांगत त्यांच्या कार्याला सलाम केला.
सत्काराला उत्तर देताना भावूक झालेले डॉ. कन्ना मडावी म्हणाले, “हा नागरी सत्कार माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झालो असलो तरी समाजसेवेतून कधीही निवृत्त होणार नाही. ज्या मातीतून आणि समाजातून मी घडलो, त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करत राहीन.”
कार्यक्रमात आदिवासी नेते सैनूजी गोटा, नगरसेवक अमोल मुक्कावार, सामाजिक कार्यकर्त्या पूर्वा दोन्तुलवार, माजी प्राचार्य रतन दुर्गे यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. मडावी यांच्या सेवाकार्याचा गौरव केला.
याआधी डॉ. मडावी यांना आनंदीबाई जोशी पुरस्कार, उत्कृष्ट स्त्रीरोग तज्ज्ञ पुरस्कार, वीर बाबुराव शेडमाके स्मृती पुरस्कार, NACO विशेष पुरस्कार, आर.एम.ए. नागपूर उत्कृष्ट स्त्रीरोग तज्ज्ञ पुरस्कार, कै. बाबुराव मडावी जीवन गौरव पुरस्कार आणि शिवप्रिय शांती पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
राणी दुर्गावती हायस्कूल, आलापल्लीच्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन प्राजक्ता पेदापल्लिवार यांनी तर आभार प्रदर्शन किशोर पाचभाई यांनी केले. अहेरीसह संपूर्ण परिसरातील डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

nagvidarbhavartae