Google search engine
Home आपला विदर्भ अहेरी पोलिसांची मोठी कारवाई: आलापल्ली जंगलात ३.५ लाखांचा मोहसडवा जप्त; ३ आरोपींवर...

अहेरी पोलिसांची मोठी कारवाई: आलापल्ली जंगलात ३.५ लाखांचा मोहसडवा जप्त; ३ आरोपींवर गुन्हा दाखल

अहेरी (जिल्हा गडचिरोली):-
गडचिरोली पोलीस दलाने अवैध दारूविक्रेते आणि गाळणाऱ्यांविरोधात सुरू ठेवलेली धडक मोहीम अधिक तीव्र केली आहे. अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या आलापल्ली जंगल परिसरात धाड टाकून पोलिसांनी तब्बल ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर गुळामोहाचा सडवा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १८ जून) सायंकाळच्या सुमारास अहेरी पोलिसांचे पथक गस्तीवर होते. दरम्यान, आलापल्ली जंगल परिसरातील नाल्याजवळ (पूर्वेस ९ किमी) काही व्यक्ती विनापरवाना व अवैधरित्या दारू गाळण्याच्या उद्देशाने गुळामोहाचा सडवा बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

१० ड्रममधून ७ हजार लिटर सडवा जप्त:-
माहिती मिळताच पोलीस पथकाने सायंकाळी ६:३० ते रात्री ८:१० वाजताच्या दरम्यान सदर घटनास्थळावर अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना १०० लिटर क्षमतेचे १० निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम आढळून आले. या ड्रममध्ये एकूण ७,००० लिटर गुळामोहाचा सडवा (किंमत ५० रुपये प्रति लिटरप्रमाणे एकूण ३,५०,००० रुपये) मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला.

या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) उमेश गणपत आत्राम (वय ३६ वर्षे, धंदा- मजुरी)
२) तिरुपतम्मा भिमय्या बिटपल्लीवार (वय ३६ वर्षे, धंदा- मजुरी)
३) मनिषा प्रकाश ठाकरे (वय ३७ वर्षे, धंदा- मजुरी)
(सर्व राहणार: आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली)

या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई होमचंद्र धनराज नैताम (बकल नं. ४३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ०१७९/२०२६, कलम ६५ (फ), ८ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत (महादाका) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद दाखल अंमलदार पोलीस नाईक/५३१२ मंगेश सोनुले यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवादार/५०४३ महेश सडमेक करत आहेत. अहेरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

nagvidarbhavartae