Google search engine
Home आपला विदर्भ अहेरीत विजेच्या लपंडावाने नागरिक बेहाल; संतापलेल्या जनतेचा महावितरण कार्यालयावर थेट ‘हल्लाबोल’!

अहेरीत विजेच्या लपंडावाने नागरिक बेहाल; संतापलेल्या जनतेचा महावितरण कार्यालयावर थेट ‘हल्लाबोल’!

कालच्या वादळी पावसाने वीज गुल; रात्रभर नागरिक अंधारात, संतप्त अहेरीकरांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अहेरी/पंकज नौनुरवार:-
गेल्या काही दिवसांपासून अहेरी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने काल परिसीमा गाठली. काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे विजेच्या तारांवर झाडे कोसळली आणि वीज पुरवठा खंडित झाला. मात्र, महावितरणच्या संथ आणि ढिसाळ कारभारामुळे रात्रभर वीज न आल्याने संतापलेल्या अहेरीतील शेकडो नागरिकांनी आज थेट महावितरण कार्यालयावर ‘हल्लाबोल’ केला. संतप्त जनतेने अधिकाऱ्यांना कार्यालयातच धारेवर धरत आपला तीव्र रोष व्यक्त केला.

रात्रभर नागरिक अंधारात; उकाड्याने ‘झोप’ उडाली!
काल झालेल्या अनपेक्षित पावसामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने पंखे आणि कुलर बंद पडले. कडक उन्हाळा आणि असह्य उष्णतेमुळे नागरिकांना रात्रभर डोळ्याची पापणीही मिटता आली नाही. “रात्रभर उकाड्यामुळे झोपच आली नाही, नागरिक पुरते बेहाल झाले आहेत,” अशी संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे यामुळे अतोनात हाल झाले.
संयम सुटला! नागरिकांनी गाठले महावितरण कार्यालय.
रात्रभर अंधारात काढल्यानंतर, आज सकाळीही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून कोणतीही ठोस हालचाल दिसत नसल्याने नागरिकांचा संयम सुटला. अहेरीतील संतप्त नागरिकांनी एकत्र येत रात्रीच थेट महावितरणचे कार्यालय गाठले. नागरिकांनी कार्यालयात ठिय्या मांडत अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार केला. “दरवर्षी पावसाळापूर्व कामांच्या नावावर केवळ कागदी घोडे नाचवले जातात का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. यावेळी कार्यालय परिसरात काही काळ तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

• पावसाळापूर्व कामांची पुरती पोलखोल!
दरवर्षी महावितरणकडून विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्याचा दावा केला जातो. मात्र, पहिल्या-दुसऱ्या वादळी पावसातच ठिकठिकाणी झाडे पडून वीज यंत्रणा कोलमडल्याने या दाव्यांची पुरती पोलखोल झाली आहे. महावितरणच्या या निष्काळजीपणामुळेच आज संपूर्ण अहेरीला अंधारात राहावे लागत असल्याचा आरोप आंदोलक नागरिकांनी केला.
मात्र, ‘जेव्हा नागरिक रस्त्यावर उतरतात, तेव्हाच महावितरणला जाग येते का?’ असा सवाल आता अहेरी परिसरातील जनता विचारत आहे. आगामी मुख्य पावसाळा पाहता महावितरणने आपली यंत्रणा तातडीने सुधारावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अहेरीकरांनी दिला आहे.

nagvidarbhavartae