
नागपूर/विदर्भ :-
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली असून ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी नागपूर येथे ‘विदर्भ निर्माण लॉंग मार्च’ आणि भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, युवा, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात “वेगळा विदर्भ हाच आमचा निर्धार”, “वेगळा विदर्भ झालाच पाहिजे” आणि “स्वतंत्र विदर्भ आमचा हक्क” अशा घोषणांसह विदर्भवासीयांना एकजुटीचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भाच्या विकासासाठी, न्याय्य हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती ही काळाची गरज असल्याचा दावा समितीने केला आहे.
आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून, दुपारी १२ वाजता नागपूरच्या दीक्षाभूमी येथून संविधान चौकापर्यंत लॉंग मार्च निघणार आहे. मार्चनंतर संविधान चौक येथे जाहीर सभा होणार असून त्यामध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीबाबत पुढील दिशा, आंदोलनाची भूमिका आणि भविष्यातील कार्यक्रमांची माहिती दिली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, विदर्भ हा नैसर्गिक संपत्ती, खनिजसंपदा, जंगलसंपदा आणि कृषी क्षेत्रात समृद्ध असूनही विकासाच्या बाबतीत मागे राहिला आहे. रोजगार, सिंचन, उद्योग, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि पायाभूत विकासाच्या प्रश्नांवर विदर्भाला अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचा आरोप करत स्वतंत्र राज्याची मागणी अधिक तीव्र करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर क्रांती दिनी होणाऱ्या या आंदोलनाला ऐतिहासिक स्वरूप देण्याचा समितीचा प्रयत्न असून, विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने नागरिक नागपूरात दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. “आपली उपस्थितीच विदर्भाच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा ठरेल,” असे आवाहन समितीने केले आहे.
समितीने विदर्भातील सर्व नागरिकांना पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला लोकशक्तीचा पाठिंबा मिळावा आणि सरकारपर्यंत विदर्भवासीयांचा आवाज ठामपणे पोहोचावा, हा या आंदोलनामागील प्रमुख उद्देश असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
• कार्यक्रमाची माहिती:-
दिनांक : ९ ऑगस्ट (क्रांती दिन)
वेळ : दुपारी १२.०० वाजता
मार्ग : दीक्षाभूमी ते संविधान चौक, नागपूर
कार्यक्रम : विदर्भ निर्माण लॉंग मार्च व जाहीर सभा
आयोजक : विदर्भ राज्य आंदोलन समिती
नेतृत्व : ॲड. वामनराव चटप



