अहेरी:-
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात एक खळबळजनक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत एका पोटाच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची लाकडी बल्लीने डोक्यावर व चेहऱ्यावर जबर प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना लगाम चेक येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून, अहेरी पोलिसांनी आरोपी मुलाला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक नारायण आशा टेकाम (वय ६१ वर्षे, रा. लगाम चेक) हे आपल्या कुटुंबासह राहत होते. ४ जून २०२६ रोजी रात्री १०:०० ते ११:५० वाजेच्या सुमारास, मृतकाचा मोठा मुलगा आरोपी विजय नारायण टेकाम (वय ४० वर्षे) हा दारूच्या नशेत धुंद होऊन घरी आला. घरी आल्यानंतर त्याचा वडील नारायण टेकाम यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला.
हा वाद इतका टोकाला गेला की, दारूच्या नशेत असलेल्या विजयने रागाच्या भरात घरात असलेली जड लाकडी बल्ली उचलली आणि थेट वडिलांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्यामुळे नारायण टेकाम यांचा जागीच मृत्यू झाला.
या रक्ताळलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबातील ज्येष्ठ महिला तुळशीराम आशा टेकाम (वय ६५ वर्षे, धंदा- मजुरी) यांनी या घटनेची माहिती अहेरी पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून अहेरी पोलिसांनी आरोपी विजय टेकाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अहेरी पोलीस ठाण्यात अप. क्र. ०१६६/२०२६ नुसार नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३ (१) (हत्येचा गुन्हा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करत आरोपी मुलगा विजय टेकाम याला ताब्यात घेतले असून, त्याला अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
दारूच्या एका भीषण व्यसनामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाला असून, वडिलांचा मृत्यू आणि मुलगा गजाआड गेल्याने टेकाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.





