
युवा कलाकार साहिल अनलदेवार
गडचिरोली/अहेरी :- मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित ‘घबाडकुंड’ चित्रपटाला प्रदर्शना नंतर प्रेक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून, या चित्रपटात अहेरी येथील युवा कलाकार साहिल अनलदेवार याने साकारलेल्या भूमिकेचीही विशेष चर्चा होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीसारख्या दुर्गम भागातील युवकाने मराठी चित्रपटसृष्टीत आपली छाप उमटवल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
‘घबाडकुंड’ हा मराठीतील पहिल्या सिनेमॅटिक हॉरर युनिव्हर्सचा भाग मानला जात असून, अत्याधुनिक व्हीएफएक्स, तांत्रिक दर्जा, कौटुंबिक नाट्य, रहस्य आणि थरार यांचा संगम या चित्रपटात पाहायला मिळतो. विशेष म्हणजे चित्रपटातील अंडरवॉटर फायटिंग सिक्वेन्स प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
‘घबाड’ म्हणजे गाडलेला धनसाठा आणि ‘कुंड’ म्हणजे विहिरीसारखी रचना. या संकल्पनेवर आधारित कथानकात साहिल अनलदेवार याने पुरातन काळातील एका महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने विशेष मेकओव्हर केला असून, त्याचा लूक आणि अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
चित्रपटाच्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना साहिल अनलदेवार यांनी निर्माते डॉ. रसिक कदम यांचे विशेष आभार मानले. तसेच यवतमाळचे दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी दिलेल्या संधीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण चित्रपटाच्या टीमने दिलेल्या सहकार्यामुळे ही भूमिका प्रभावीपणे साकारता आल्याचे त्यांनी सांगितले.
अहेरीच्या युवकाने मराठी चित्रपटसृष्टीत केलेली ही उल्लेखनीय कामगिरी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, स्थानिक नागरिकांकडून साहिलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘घबाडकुंड’च्या यशासह साहिल अनलदेवार याची अभिनय कारकीर्द अधिक उज्ज्वल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



