Google search engine
Home गडचिरोली अहेरी व आलापल्ली बस डेपोमध्ये प्रवाशांसाठी शीतपेय (वॉटर कूलिंग) मशीनचे लोकार्पण

अहेरी व आलापल्ली बस डेपोमध्ये प्रवाशांसाठी शीतपेय (वॉटर कूलिंग) मशीनचे लोकार्पण

अहेरी: – तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीची आणि महत्त्वाची बस स्थानके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी व आलापल्ली बस डेपोमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वॉटर कूलिंग (शीतपेय) मशीनचे लोकार्पण करण्यात आले. हा उपक्रम आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सौजन्याने राबविण्यात आला असून, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.

दररोज हजारो प्रवासी अहेरी व आलापल्ली बस स्थानकातून प्रवास करत असतात. विशेषतः उन्हाळा, पावसाळा आणि विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशातून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार असून, ही सुविधा सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे पदाधिकारी, कार्यकर्ते, अहेरी आगाराचे आगार प्रमुख, बस डेपोचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. उपस्थितांनी या लोकहिताच्या उपक्रमाचे स्वागत करत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम व तनुश्रीताई आत्राम यांचे आभार व्यक्त केले.

अहेरी व आलापल्ली ही तालुक्यातील प्रमुख वाहतूक केंद्रे असल्याने ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रवाशांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देणारा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली

nagvidarbhavartae