Google search engine
Home आपला विदर्भ शिक्षक रविंद्र यमसलवार यांच्या पाच शैक्षणिक व संस्कारक्षम पुस्तकांचे थाटात प्रकाशन; मान्यवरांकडून...

शिक्षक रविंद्र यमसलवार यांच्या पाच शैक्षणिक व संस्कारक्षम पुस्तकांचे थाटात प्रकाशन; मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव

अहेरी (प्रतिनिधी ):-
शिक्षण क्षेत्रातील योगदानासोबतच आपल्या संवेदनशील लेखणीने साहित्यात भर घालणारे शिक्षक व लेखक रविंद्र रत्नाकर यमसलवार यांच्या पाच महत्त्वपूर्ण पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच भामरागड आणि अहेरी येथे अत्यंत उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षकांना अध्यापनात सुलभता यावी, या उद्देशाने लिहिलेल्या या पुस्तकांचे साहित्य वर्तुळातून आणि शिक्षण क्षेत्रातून जोरदार स्वागत होत आहे.

•∆ दोन टप्प्यांत पार पडला विमोचन सोहळा
लेखक यमसलवार यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन दोन वेगवेगळ्या स्तरावर, दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले:
• भामरागड येथे डॉ. प्रकाश आमटेंच्या हस्ते प्रकाशन:
लोक बिरादरी प्रकल्प, भामरागड येथे आयोजित पहिल्या टप्प्यात, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाशभाऊ आमटे यांच्या हस्ते ‘भारतीय संस्कृतीचा वारसा’आणि ‘शालेय परिपाठ’या दोन अत्यंत उपयुक्त पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
•अहेरी येथे तीन पुस्तकांचे विमोचन:
अहेरी येथील जिल्हा सहकारी पतसंस्था सभागृहात पार पडलेल्या दुसऱ्या सोहळ्यात ‘संस्कारक्षम बोधकथा’, ‘मराठी बोधकथा’ आणि ‘मराठी व्याकरण’ या तीन पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.

•गुरु-शिष्यांच्या भेटीने सोहळा भावूक; राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकांकडून गौरव:
अहेरी येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक विनोद भोसले होते. अध्यक्षीय भाषणादरम्यान भोसले सरांनी, “लेखक रविंद्र यमसलवार हे माझेच विद्यार्थी आहेत,” अशी अभिमानास्पद आठवण सांगताच संपूर्ण सभागृह भावूक झाले. या प्रसंगी भोसले सरांनी स्वतःच्या हाताने यमसलवार यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार केला.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ.प्रवीण पुल्लूरवार, खुर्शीद शेख आणि सेवानिवृत्त शिक्षक बबलू सडमेक प्रामुख्याने उपस्थित होते.

•”पुस्तके जीवनमूल्ये रुजवणारी ठरतील” – रविंद्र यमसलवार
आपले मनोगत व्यक्त करताना लेखक रवींद्र यमसलवार म्हणाले की, “शिक्षण क्षेत्रात काम करत असताना केवळ शालेय अभ्यासक्रम पूर्ण करणे पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. ही पाचही पुस्तके शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरतील आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम जीवनमूल्ये रुजविण्यास मदत करतील, असा मला विश्वास आहे.”
या साहित्यिक सोहळ्याला राजूभाऊ आत्राम, लक्ष्मणभाऊ गद्देवार, राम पुलगमकर आणि समाजसेवक महेशभाऊ बेझंकीवार यांच्यासह परिसरातील अनेक शिक्षक, साहित्यिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच यमसलवार यांच्या या शैक्षणिक व साहित्यिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रमोद रोहनकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार यमाजी मुंजमकर यांनी मानले.

nagvidarbhavartae