Google search engine
Home आपला विदर्भ प्रेमसंबंधाचे लग्नात रूपांतर होणार होते, पण त्याआधीच घेतला जीव; सुरजागड कंपनीतील तरुणीची...

प्रेमसंबंधाचे लग्नात रूपांतर होणार होते, पण त्याआधीच घेतला जीव; सुरजागड कंपनीतील तरुणीची आत्महत्या.

अहेरी:-
          चामोर्शी तालुक्यातील मार्कडा येथील रहिवासी आणि सध्या आलापल्ली येथे राहून सुरजागड कंपनीच्या खमनचेरू स्टॉकयार्डमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या २६ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्नेहा हिवराज कुमरे असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
•लग्नाची तयारी असतानाच टोकाचे पाऊल:
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहाचे खमनचेरू येथील सुरजागड कंपनीतच पोकलेन चालक म्हणून काम करणाऱ्या राहुल रंगाराव घरात (वय २७, रा. चंद्रपूर) याच्यासोबत मागील तीन महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्याही कुटुंबीयांनी या प्रेमाला संमती दिली होती आणि रीतीरिवाजाप्रमाणे लग्न करण्याचेही निश्चित झाले होते. मात्र, सर्व काही सुरळीत सुरू असतानाच स्नेहाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे गुढ अजूनही कायम आहे.
•घरमालकिणीच्या फोननंतर घटना उघड:
बुधवारी (१५ जुलै) रात्री १०:४० च्या सुमारास स्नेहा राहत असलेल्या खोलीच्या घरमालकिणीने तिच्या आईला फोन करून माहिती दिली की, स्नेहाने ओढणीने गळफास घेतला आहे. माहिती मिळताच नातेवाईक आलापल्ली येथे दाखल झाले. त्यानंतर अहेरी पोलिसांच्या मदतीने तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी (१६ जुलै) पहाटे १:०० वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी मृत तरुणीची आई शिला हिवराज कुमरे यांच्या रिपोर्टवरून अहेरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग क्र. ३१/२०२६, कलम १९४ बी.एन.एस.एस.) करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले आणि महिला पोलीस नाईक मनिषा मुलकवार पुढील तपास करत आहेत.
या घटनेतील आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

nagvidarbhavartae