गडचिरोली/अहेरी:-
गडचिरोली पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्र फिरवत मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना पोलिसांनी २४ तासांच्या आत गडचिरोली येथून ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजूनही तीन आरोपी फरार असून त्यांची शोध मोहीम पोलिस करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गुन्ह्याची गांभीर्यता ओळखून पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा गतिमान केली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली होती. अखेर गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत कंकडालवार यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

अजय कंकडालवार यांना ताब्यात घेतल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आणि गुन्ह्यातील अधिक पुरावे गोळा करण्यासाठी न्यायालयात पोलीस कोठडीची (PCR – Police Custody Remand) मागणी करणार असल्याचे समजते.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे करत असून, कंकडालवार यांना पोलीस कोठडी मिळणार की त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



